मैत्रीच्या वेलींवर प्रीतीची फुले...
दोन शब्द वचनपूर्ती म्हणून सर्वात आधी मी तिच्यावर ही कथा लिहिण्याचे ठरवले. दिलेल्या शब्दांवर ठाम राहणे ह्या सवयीचा हा एक प्रकारे फायदाही आणि तोटाही. कथेलाही मला तिचेच नाव द्यावेसे वाटे पण तिच्या होकारा शिवाय शक्य नव्हते... माझ्या लेखकी कारकिर्दीतील ही पहिलीच कथा असावी.. म्हणून थोडा आनंदही होतो आणि दुःखही. कारण एखादी गोष्ट आपल्याला मिळायची असते , जिच्यावर आपण मन लावून बसतो , पण ती मिळत नाही , तेव्हा दुःख होत आणि ते असहनीय असतं. आयुष्यात प्रत्येकाने कमवलंय आणि गमवलंय सुद्धा , पण माणसाचं हे जुलमी मन त्याच्या आयुष्यात येणाऱ्या दुःखदायी गोष्टींकडेच जास्त लक्ष देण्याची संमती देतं. आनंदी गोष्टी , ह्या अल्पायुषीच ठरतात , म्हणून लिहिता लिहिता सर्व लिहून झालं की मन एकदाच शांत होईल , या आशेने मी भर भर लिहायला सुरुवात केली... कारण माझ्याजवळ माझं मन हलकं करवून देणारा इतर कुणी व्यक्ती नव्हताच... ...